नवी मुंबई : कोकण पदवीदार मतदारसंघासह भिवडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्ष निवडणूक लढणार असल्याची घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी केली. नवी मुंबईच्या ऐरोलीत कोकण विभागाच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.
काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन केले असून, लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने करावयाचे संघटनात्मक बदल, पक्षांतर्गत सुधारणा यांचा आढावा बैठकीत घेण्यात आल्याचे पटोले यांनी सांगितले.
लोकांचा विश्वास कमी होत चालल्याने भाजपने जातीपातीचे बीज पेरले आहे. एक्स (आधीचे ट्विटर) पेजवरून राहुल गांधी यांचा रावणरूपी फोटो शेअर करणाऱ्या भाजपच्या रावणवृत्तीचा हिशेब जनता चुकता करेल. भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी इंडिया आघाडी एकत्र लढणार आहे. भाजप शेतकरी, कामगार, बहुजनांच्या विरोधात आहे, असे यावेळी पटोले म्हणाले. नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव मिळेपर्यंत काँग्रेस शांत बसणार नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेसच्या आढावा बैठकीस प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, माजी खासदार हुसेन दलवाई, प्रदेश काँग्रेसच्या महिला अध्यक्षा संध्या सव्वालाखे उपस्थित होत्या.

