मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील उर्वरित कामांसह माणगाव व इंदापूर बाह्यवळण, चिपळूण उड्डाणपूल, संगमेश्वर येथील पूल आणि कोकणातील इतर महत्त्वाच्या रस्ते विकास प्रकल्पांची कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून ही कामे युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत दिली.
महाराष्ट्र विधानसभा नियम 293 अंतर्गत मांडण्यात आलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मंत्री भोसले यांनी विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा सादर केला.
ते म्हणाले की, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ बाह्यवळणाचे काम पूर्ण झाले असून माणगाव आणि इंदापूर बाह्यवळणाच्या उर्वरित कामांना गती देण्यात आली आहे. माणगाव बाह्यवळणाच्या साडेसात किलोमीटर प्रकल्पातील रेल्वे उड्डाणपुलाचे 75 टक्के काम पूर्ण झाले असून, त्याची एक बाजू गणेशोत्सवापूर्वी म्हणजेच 31 ऑगस्ट 2026 पूर्वी वाहतुकीसाठी खुली करण्याचे नियोजन आहे. तसेच या प्रकल्पातील दोन्ही प्रमुख पुलांची 90 टक्के आणि व्हायडक्टची 95 टक्के कामे पूर्ण झाली असून ती 31 जुलै 2026 पर्यंत पूर्ण होतील.
इंदापूर बाह्यवळणाच्या साडेतीन किलोमीटर लांबीच्या प्रकल्पातील दोन्ही रेल्वे उड्डाणपुलांची सुमारे 40 टक्के कामे पूर्ण झाली असून हा प्रकल्प 31 डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
पनवेल ते झाराप या 449 किलोमीटर लांबीच्या मुंबई-गोवा महामार्गापैकी 417 किलोमीटरचे चौपदरीकरण पूर्ण झाले असून उर्वरित कामेही लवकरच पूर्ण करण्यात येतील, असेही मंत्री भोसले यांनी स्पष्ट केले.
चिपळूण येथील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून तो ऑगस्ट 2026 पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. तसेच संगमेश्वर येथील सोनवी नदीवरील पूल आणि त्याचे जोडरस्तेही ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण होतील, अशी माहिती त्यांनी दिली.
परशुराम घाट परिसरात वारंवार होणाऱ्या दरडी कोसळण्याच्या घटना लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यायी व्हायडक्ट उभारण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पाला लवकर मंजुरी मिळावी यासाठी आवश्यक पाठपुरावा सुरू असल्याचेही मंत्री भोसले यांनी सांगितले.
याशिवाय, मुंबईतील भायखळा येथील डॉकयार्ड रोड परिसरासह दरडप्रवण भागांमध्ये संरक्षणात्मक उपाययोजना राबविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे प्रस्ताव सादर केला असून आवश्यक मंजुरीनंतर ही कामे तातडीने हाती घेण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

