राज्यात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे राम कदम यांनी मुंबईतील कबुतरांमुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक धोक्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. शहरातील कबुतरखाने निवासी भागातून हटवून शहराबाहेरील नॅशनल पार्क किंवा फिल्मसिटी परिसरात स्थलांतरित करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली.
यावेळी बोलताना राम कदम यांनी अत्यंत भावनिक अनुभव मांडला. त्यांनी सांगितले की, त्यांच्या आईचे निधन इंटरस्टिशियल लंग डिसीज (ILD) या गंभीर फुफ्फुसाच्या आजारामुळे झाले. त्यांच्या मते, कबुतरांच्या विष्ठेमुळे हवेत पसरत असलेल्या हानिकारक घटकांमुळे हा आजार होण्याचा धोका वाढू शकतो.
कदम म्हणाले, "माझ्या आईला ILD हा गंभीर फुफ्फुसाचा आजार झाला होता. या आजारावर प्रभावी उपचार उपलब्ध नाहीत. उपचारादरम्यान रुग्णाला सतत ऑक्सिजनवर ठेवावे लागते. माझी आई सलग १५-१५ मिनिटे खोकायची आणि अनेकदा खोकल्याच्या झटक्यांमुळे बेशुद्ध पडायची. अशा वेदनादायी अवस्थेत अनेक ILD रुग्ण जगत आहेत."
कबुतरांमुळे होणाऱ्या आरोग्याच्या धोक्याचा विचार करून शहरातील कबुतरखाने निवासी भागातून हटवून मुंबईबाहेरील नॅशनल पार्क किंवा फिल्मसिटी परिसरात स्थलांतरित करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली. या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याबाबत सभापतींनी निर्देश दिल्याची माहितीही त्यांनी सभागृहात दिली.
राम कदम यांनी स्पष्ट केले की, "या विषयात कोणतेही राजकारण नाही. कबुतरांचाही जीव महत्त्वाचा आहे. मात्र नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितताही तितकीच आवश्यक आहे. आजार हा धर्म, जात किंवा पंथ पाहून होत नाही. त्यामुळे वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे."
कबुतरांमुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबतची ही चर्चा विधानसभेत रंगली असून, या विषयावर सरकार पुढे कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

