आयआयटी बॉम्बे येथे 720 कोटी रुपयांची क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा - माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

Rajesh Palshetkar
By -
0

 मुंबई, दि. 15 : प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2023 मध्ये 6000 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय क्वांटम मिशनची सुरुवात झाली. त्यामुळे देशाच्या क्वांटम क्षेत्रातील प्रगतीस मोठा वेग मिळाला. त्याचबरोबर, महाराष्ट्र शासनानेही या क्षेत्रात पुढाकार घेत ‘महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन’ सुरू केले असून, उद्योग-सिद्ध मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला जात आहे. त्यात आयआयटी बॉम्बे येथे 720 कोटी रुपयांची क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा उभारली जात असून, ही भारतातील पहिली फुल-स्टॅक क्वांटम हार्डवेअर प्रणाली ठरणार आहे. तसेच टाटा कन्स्ल्टन्सी सर्व्हिसेस आणि आयआयटी बॉम्बे यांच्या सहकार्याने देशातील पहिल्या क्वांटम डायमंड मायक्रोचिप इमेजरवर काम सुरू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही काही कंपन्यांनी हजारो किलोमीटर अंतरावर हॅक-प्रूफ क्वांटम कम्युनिकेशनमध्ये यश मिळवले आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली.


जागतिक क्वांटम दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी क्वांटम तंत्रज्ञानाचे महत्त्व सांगून महाराष्ट्राला 2030 पर्यंत या क्षेत्रात जागतिक नेतृत्व मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात मुख्य सचिव राजेश अग्रवाल, विभागाचे सचिव विरेंद्र सिंग, आयशर पुणे चे प्रो.उमाकांत रासोल, आयबीएम इंडियाचे संचालक अमित सिंघवी, महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर तसेच मंत्रालयातील अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव तसेच  प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.


माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, क्वांटम तंत्रज्ञान हे केवळ सायन्स फिक्शन राहिलेले नाही, तर संगणक, संवाद व्यवस्था, आरोग्य, वित्त आणि राष्ट्रीय सुरक्षेसारख्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवणारे पुढील पाऊल आहे. पारंपरिक संगणकातील ‘बिट्स’पासून ‘क्युबिट्स’पर्यंत झालेला प्रवास हा तंत्रज्ञानातील मोठा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले.


क्वांटमची संकल्पना सोप्या शब्दांत स्पष्ट करताना मंत्री ॲड.शेलार यांनी ‘परिमाण आणि मापन’ यावर आधारित उदाहरण दिले. नकाशावर दिसणारे अंतर आणि प्रत्यक्षातील अंतर यातील फरक समजून घेण्याची मानवी क्षमता हीच पुढे क्वांटम तंत्रज्ञानाच्या रूपात विकसित झाल्याचे त्यांनी सांगितले.


मंत्री ॲड.शेलार यांनी उद्योग क्षेत्र आणि तरुणांना या ‘क्वांटम क्रांतीत’ सहभागी होण्याचे आवाहन करत शासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधा, प्रोत्साहन आणि सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल, असे सांगितले. तसेच तंत्रज्ञानावर आपण आरूढ झालो नाही, तर तंत्रज्ञान आपल्यावर आरूढ होईल, असे सांगून त्यांनी क्वांटम युगात सक्रिय सहभागाची गरज व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!