पहाटेच धडकले 'पिवळे पंजे'
मानखुर्दच्या सर्व्हे नंबर १ आणि २ मधील ११ एकर जमिनीवर गेल्या अनेक वर्षांपासून भूमाफियांनी अतिक्रमण करून बेकायदेशीर वसाहत वसवली होती. वारंवार इशारा देऊनही हे अतिक्रमण हटवले जात नव्हते. अखेर जिल्हाधिकारी सौरभ काटियार यांनी सूत्रे हाती घेत मास्टर प्लॅन तयार केला आणि पहाटेच मोठा पोलीस फौजफाटा घेऊन प्रशासनाचे बुलडोझर घटनास्थळी दाखल झाले.
कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि संयुक्त कारवाई
कोणताही विरोध होऊ नये यासाठी डीसीपी समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली ४०० पोलीस जवानांनी परिसराला वेढा घातला होता. बीएमसी, पोलीस आणि महसूल विभागाच्या या संयुक्त मोहिमेमुळे भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. रेल्वे विकास आणि इतर महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी ही जमीन अत्यंत मोलाची असल्याने ही कारवाई करणे अनिवार्य होते, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सॅटेलाइटची नजर; आता सुटका नाही
या कारवाईनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला इशारा भूमाफियांची झोप उडवणारा आहे. २०११ पासूनच्या सर्व सॅटेलाइट इमेजेस (उपग्रह छायाचित्रे) तपासली जात असून, २०११ नंतर १ इंच जमिनीवरही केलेले अतिक्रमण आता प्रशासनाच्या नजरेतून सुटणार नाही. जर पुन्हा कोणी या जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, तर केवळ झोपड्या तुटणार नाहीत, तर थेट जेलवारी होईल, असा कडक इशाराही देण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांचा 'झिरो टॉलरन्स' संदेश
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, सरकारी जमिनीवरील कोणतेही अवैध अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही. त्यांच्या या 'झिरो टॉलरन्स' धोरणामुळेच मुंबईत सध्या अतिक्रमणांविरोधात बुलडोझरचा धडाका सुरू आहे.
क्षेत्रफळ: ११ एकर सरकारी जमीन मुक्त.
कारवाई: १२०० पेक्षा जास्त अवैध झोपड्या जमीनदोस्त.
तंत्रज्ञान: २०११ पासूनच्या सॅटेलाइट फोटोंद्वारे पाळत.
इशारा: पुन्हा अतिक्रमण केल्यास थेट तुरुंगवास.
