ठाणे ग्रामीण जिल्हा कार्यक्षेत्रात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार मनाई आदेश जारी केला आहे. हा आदेश दिनांक ३१/०५/२००२६ रोजीचे १२.०० वा. पासून ते दिनांक १५/०६/२०२६ रोजीचे १२.०० वा.पर्यंत लागू राहणार आहे.
का लागू करण्यात आला मनाई आदेश?
पोलीस अधीक्षक, ठाणे (ग्रामीण) यांच्याकडून प्राप्त पत्रानुसार, ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्ष, संघटनांकडून तसेच स्थानिकांकडून आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा, रॅली, धरणे, उपोषण इत्यादी विविध प्रकारची आंदोलने करण्यात येत असतात. तसेच, विविध राजकीय पक्ष व संघटनेचे नेते, महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे नियोजित असतात.
सदर वेळी विरोधी पक्ष, संघटना किंवा नाराज घटकांकडून निदर्शने करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर समाजकंटक व गुंड प्रवृत्तीच्या इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे सोयीचे व्हावे आणि कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या गोष्टींवर असेल पूर्णपणे बंदी:
- शस्त्रास्त्रे, तलवारी, भाले, दंडे, सोटे, बंदुका, सुरे, लाठ्या अथवा काठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे.
- कोणताही क्षारक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे.
- दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा लोकांत प्रचार करणे.
- व्यक्तीचे प्रेत किंवा आकृती किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे.
- सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे.
- ज्यामुळे सभ्यता अगर नीती यास धक्का पोहचेल अशा किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशा प्रकारची भाषणे, तत्वे, हावभाव करणे, सोंग आणणे किंवा चित्रे, चिन्हे, फलक किंवा कोणतीही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किंवा लोकांत प्रचार करणे.
- पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी (जमावबंदी).
ठाणे ग्रामीण जिल्हा कार्यक्षेत्रात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच साजरे होणारे सण-उत्सव व निवडणूक शांततेत पार पडावेत, यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून हा आदेश माझ्या स्वाक्षरी व शिक्क्यानिशी निर्गमित केला असल्याचे स्पष्ट केले आहे.

