रत्नागिरीः दिवाळी काही दिवसांवर आली असताना खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून अव्वाचे सव्वा प्रवासी तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. मुंबई व पुण्यासाठी सुमारे दिड ते दोन हजार पर्यंत तिकीट दर वाढविण्यात आले आहे.

एसटी तिकीट दराच्या केवळ दिडपट दर आकारणी करण्याचा नियम खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून धाब्यावर बसविण्यात येत आहे. मुंबई व पुण्यामध्ये वास्तव्य करणारे चाकरमानी हे सुट्टया आल्या की गावाकडे येण्यास आतुरलेले असतात. आता दिवाळीच्या सुट्टया असल्याने चाकरमान्यांना गावचे वेध लागले आहेत. याच गोष्टीचा फायदा खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून उठविण्यात येत आहे. एरवी ६०० ते ८०० रूपये असणारे तिकीट हे आता दिड हजार ते दोन हजार पर्यंत जावून पोहचले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला मोठा चाट पडत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. गणपती, दिवाळी व मे महिन्यात खासगी ट्रॅव्हल्सला मोठी मागणी येत असते. मिळेल त्या वाहनाने चाकरमानी गावची वाट धरत असतात. प्रवाशांची लूट होवू नये यासाठी शासनाने तिकीट दराबाबत काही नियम घालून दिले होते. त्यानुसार तिकीट दर हा जास्तीत जास्त एसटी दराच्या दिडपट असेल असा नियम केला. खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून हे नियम सर्रासपणे धाब्यावर बसविले जात आहेत.
खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून वाढीव तिकीट दर आकारला जात असल्याबाबत तक्रार आल्यास त्यासंबंधी खात्री करून कारवाई करण्यात येईल. आमच्या अधिकारात असणाऱ्या गोष्टी जसे ड्रायव्हरचे लायसन्स व गाडीचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल. - अजित ताम्हणकर (सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी)
कोणालाही न जुमानता आपला मनमानी कारभार ट्रॅव्हल्स कंपन्याकडून केला जात आहे. शासनाने या ट्रॅव्हल्स कंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे. मात्र सध्यस्थितीत कोणत्याही प्रकारे कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस कोकणवासियांच्या खिशाला तिकीटदराचा मोठा भुर्दंड पडणार असेच दिसत आहे.