कोरोणाकाळात खाणकाम चालू असताना तसेच नियम धाब्यावर बसवून रात्रंदिवस काम करणाऱ्या कंपनीचे खनन कार्य ग्रामस्थांनी बंद पाडल्याने नुकसानग्रस्तांच्या घरांचा सर्वे करण्यात येऊन त्यानुसार नुकसान भरपाई देण्याचे शुष्क आश्वासन देण्यात आले मात्र वर्ष उलटूनही ग्रामस्थांना याबाबत प्रतिसाद देण्यास प्रशासन आणि कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी घरांचे झालेल्या नुकसानाबाबत पुढील निर्णय घेण्यासाठी पवारसाखरी ग्रामस्थांची ग्रामपंचायत कार्यालयात आज दुपारी चर्चा करण्यासाठी सभेचे आयोजन केले आहे.
याच पार्श्वभूमीवर सदर कंपनीला बेकायदेशीरपणे मौन संमती देऊन कंपनीच्या नियमबाह्य कामकाजास संरक्षण देऊ पाहणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्यासह तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांच्यावर सामाजिक कार्यकर्ता राजेश पालशेतकर यांनी राज्यस्तरीय शासन/प्रशासनामार्फत कारवाई केल्यानंतर नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार प्रतिभा वराळे व अन्य अधिकारी यांस घटनास्थळावर पाठवून पाहणी केली व नुकसान भरपाईचे कंपनीस लेखी आदेश दिले होते.
त्यानुसार कंपनीने केवळ राजेश पालशेतकर यांस नुकसान भरपाई बाबत धनादेश देण्याचे मान्य केले असता गावातील इतरही प्रकल्पग्रस्तांस नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत वैयक्तिक नुकसान भरपाई साहिल एंटरप्राइजेस कडून स्वीकारणार नसल्याची भूमिका पालशेतकर यांनी घेतली होती.
याबाबत साहिल एंटरप्राइजेस कंपनीकडे संपर्क केला असता गावा मध्ये एकमत नसल्याने तसेच आपापसातील मतभेद आणि गटातटातील कलह यामुळे नुकसान भरपाई करणे दुरापास्त होत असल्याचे सांगण्यात आले.
तसेच पवारसाखरीतील अंतर्गत वाद संपुष्टात येत नाहीत तोपर्यंत पुढील कामाला परवानगी देणार नसल्याचे खणीकर्म अधिकाऱ्याने रत्नागिरी न्यूजकडे बोलताना सांगितले.

