मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पुन्हा एकदा मराठी तरुणाला अपमानजनक वागणूक मिळाल्याची घटना घडली आहे. घाटकोपरमधील स्टेशन परिसरात सार्वजनिक शौचालय वापरल्याच्या कारणावरून एका मराठी व्यावसायिकाला अमानुष मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
📸 प्रतिकात्मक छायाचित्र
घाटकोपर पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील एका सोसायटीमध्ये ही घटना घडली. या इमारतीत महापालिकेच्या बाजार विभागाचे प्रकल्प कार्यालय असून, याच मजल्यावर अक्षय भांगरे यांचे ‘प्रतीक्षा एजन्सी’ नावाचे कार्यालय आहे. अक्षय गेल्या दीड वर्षांपासून या ठिकाणी व्यवसाय करत आहेत. मात्र, त्यांच्या कार्यालयाच्या शेजारीच व्यवसाय करणाऱ्या दोन गुजराती व्यावसायिकांनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली.
मिळालेल्या माहितीनुसार, वादाचे कारण सार्वजनिक शौचालयाचा वापर हे होते. अक्षय यांनी इमारतीतील सार्वजनिक शौचालय वापरले, ही बाब या दोन्ही व्यावसायिकांना खटकली. याच किरकोळ कारणावरून दोघांनी अक्षय यांच्याशी हुज्जत घालत त्यांना मारहाण केली.
अक्षय भांगरे यांनी सांगितले, “मी गेल्या दीड वर्षांपासून इथे व्यवसाय करतोय, पण गेल्या काही काळापासून हे दोघे विनाकारण त्रास देत होते. सार्वजनिक मालमत्ता असलेले शौचालय वापरणे हा माझा अधिकार असतानाही, त्यांनी मला मारहाण करण्यापर्यंत मजल मारली.”
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली. मारहाण होऊनही पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यानंतर मनसेने या प्रकरणात उडी घेतली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित गुजराती व्यावसायिकाच्या कार्यालयावर धडक दिली.
मनसेचे कार्यकर्ते आंदोलनासाठी येत असल्याची माहिती मिळताच संबंधित व्यावसायिकाने कार्यालय बंद केले. मात्र, मनसेच्या कार्यकर्त्यांनी तेथे ‘मुंबईत फक्त मराठी’ असा बोर्ड लिहीत आंदोलन केले.
मुंबईत मराठी माणसावर होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे. तसेच, या प्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अन्यथा ‘मनसे स्टाईल’ने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, घाटकोपरमध्ये मराठी-गुजराती वादाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मुंबईत गेल्या काही महिन्यांत गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये घर नाकारणे, शाकाहार-मांसाहारावरून वाद किंवा भाषेवरून होणारे खटके वाढले आहेत. पोलीस या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहेत.
