महिलांशी संबंधित विषय हाताळताना माध्यमांनी संवेदनशीलता व जबाबदारी जपावी - राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

Rajesh Palshetkar
By -
0

 मुंबई (विशेष प्रतिनिधी):

“माध्यमे ही केवळ माहिती देण्याचे साधन नसून समाजाची विचारसरणी घडवणारी प्रभावी शक्ती आहेत. त्यामुळे महिलांशी संबंधित विषय हाताळताना, विशेषतः त्यांच्यावरील अत्याचाराच्या घटनांचे वार्तांकन करताना विशेष संवेदनशीलता, जबाबदारी आणि अचूकता पाळणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.


राष्ट्रीय महिला आयोग आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित ‘महिला, माध्यमे आणि तंत्रज्ञान’ या एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक तथा प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, वरिष्ठ पत्रकार स्वाती गुप्ता, लेखिका रिचा सूद आदी मान्यवर उपस्थित होते.


पीडितेची ओळख जपणे सर्वोच्च प्राधान्य

महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या वृत्तांकनाबाबत बोलताना श्रीमती रहाटकर यांनी कडक निर्देश दिले की, “कोणत्याही परिस्थितीत पीडितेची ओळख उघड करू नका. भाषेचा वापर करताना पीडितेचा सन्मान राखला जाईल याची काळजी घ्या. लिंग-संवेदनशील वृत्तांकन (Gender Sensitive Reporting) हा पर्याय नसून ती प्रत्येक पत्रकाराची व्यावसायिक जबाबदारी आहे.”


डिजिटल युगात 'फॅक्ट चेक' महत्त्वाचे

आजच्या वेगवान डिजिटल युगात बातम्यांच्या पडताळणीचे आव्हान मोठे असल्याचे त्यांनी नमूद केले. “बातमी लवकर देण्यापेक्षा तिची विश्वासार्हता महत्त्वाची आहे. दिशाभूल करणाऱ्या ‘फेक न्यूज’ रोखण्यासाठी तथ्य-तपासणीला (Fact-check) प्राधान्य दिले पाहिजे,” असेही त्या म्हणाल्या.


यशकथांना अधिक प्रसिद्धी द्या

महिलांनी आज विज्ञान, संरक्षण, प्रशासन आणि उद्योजकता अशा प्रत्येक क्षेत्रात भरारी घेतली आहे. माध्यमांनी महिलांचे प्रश्न केवळ गुन्हेगारी बातम्यांपुरते मर्यादित न ठेवता, त्यांच्या यशकथा आणि प्रेरणादायी प्रवासाला अधिक प्रसिद्धी द्यावी, ज्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडेल, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


यावेळी माध्यम क्षेत्रातील ‘मीडिया ट्रायल’ टाळणे, पॉश (POSH) कायद्याची जनजागृती करणे आणि वंचित महिलांच्या आवाजाला मुख्य प्रवाहात स्थान देणे यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक गोविंद अहंकारी यांनी केले. या कार्यशाळेला मुंबईतील माध्यम प्रतिनिधी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!