मुंबई: “महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचे वार्तांकन करताना संवेदनशीलता आणि जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असते. पत्रकारांनी बातमी देताना पीडितेची ओळख पूर्णपणे गुप्त राखली पाहिजे. माध्यमांचे वार्तांकन हे पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी साहाय्यक ठरणारे असावे,” अशी स्पष्ट भूमिका ज्येष्ठ लेखिका डॉ. रिचा सूद यांनी मांडली.
राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित ‘महिला, माध्यमे आणि तंत्रज्ञान’ या एकदिवसीय कार्यशाळेत माध्यमांद्वारे केले जाणारे लिंग संवेदनशील वार्तांकन याविषयी लेखिका डॉ.सूद यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, वरिष्ठ पत्रकार स्वाती गुप्ता उपस्थित होते.
माध्यमांच्या प्रभावाबाबत बोलताना डॉ.सूद म्हणाल्या, पत्रकार केवळ बातमी देत नाही, तर समाजाच्या विचारप्रक्रियेलाही दिशा देत असतात. त्यामुळे वृत्तांकन करताना संवेदनशीलता अत्यावश्यक आहे. गुन्ह्याची तीव्रता अधोरेखित करणे, पीडितेचे वैयक्तिक आयुष्य उघड न करणे, पीडितेच्या सन्मानाचे रक्षण करणे, तिच्यावर दोषारोप टाळणे वार्तांकनात अपेक्षित आहे. त्याचबरोबर ' व्हिक्टिम' ऐवजी ‘सर्व्हायव्हर’ हा शब्द वापरावा. उत्तेजक मथळे, कपड्यांवर किंवा वैयक्तिक बाबींवर भाष्य टाळावे. गुन्हेगाराच्या जबाबदारीवर भर देत त्याला सामाजिकदृष्ट्या उत्तरदायी ठेवावे.
डॉ. सूद म्हणाल्या, माध्यमांनी सकारात्मक बातम्यांना प्राधान्य देण्याची गरज आहे. पहिल्या पानावर प्रेरणादायी आणि यशस्वी कथा आल्यास युवकांना योग्य दिशा मिळेल. सध्याच्या काही वृत्तांकन पद्धतींमध्ये गुन्ह्याचे अतिप्रदर्शन आणि शिक्षेवर कमी भर दिला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. महिलांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजना, मदत केंद्रे आणि कायदेशीर सल्ल्याची माहिती ठळकपणे प्रसिद्ध केल्यास गरजू महिलांना त्याचा मोठा लाभ होईल, असेही त्यांनी नमूद केले. इतिहासातील गौरवशाली महिलांच्या कार्याचा आदर्श घेऊन अशा प्रेरणादायी कथा जनमानसात पोहोचवण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.

