म्हसळा-श्रीवर्धनच्या पर्यटन विकासासाठी विविध प्रकल्पांना गती – मंत्री आदिती तटकरे

DM Post
By -
0

 मुंबई: श्रीवर्धन मतदारसंघाचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करण्यासाठी कणघर ता. म्हसळा येथे बायोडायव्हर्सिटी झोन विकसित करण्यात यावा. त्यासाठी सुमारे २० एकर जागा निश्चित करण्याच्या सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.


म्हसळा-श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस रायगड जिल्हाधिकारी (दूरदृश्य प्रणालीद्वारे) किसन जावळे, महाडचे कार्यकारी अभियंता कांबळे, जिल्हा वनसंरक्षक जाधव, उपअभियंता सोनिया महिल, रोहा विभागाचे वन अधिकारी स्वप्नील चोरमारे, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सूर्यवंशी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे संतोष रोकडे, संतोष जाधव तसेच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, श्रीवर्धनचा पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल आणि स्थानिकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील. कणघर परिसरातील जैवविविधतेचे संवर्धन आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी येथे बायोडायव्हर्सिटी झोन विकसित करण्यात यावा. या परिसरात निलगिरी वूड पिजन, मलबार पॅराकीट, मलबार ग्रे हॉर्नबिल, व्हाईट-चीक्ड बार्बेट आणि पर्पल-रम्प्ड सनबर्ड यांसारख्या विविध पक्षी प्रजाती आढळतात. या पक्ष्यांविषयीची माहिती पर्यटक आणि पक्षीप्रेमींपर्यंत पोहोचावी यासाठी पक्षी निरीक्षण केंद्र  उभारण्यात यावे. तसेच परिसरात वॉक-वे आणि पाथ-वे विकसित करण्यासाठी प्राथमिक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

बैठकीत दिवेआगार येथील ॲक्वारियम आणि समुद्रकिनारा सौंदर्यीकरणासंदर्भातील सादरीकरणही करण्यात आले. यासंदर्भातील प्रस्ताव महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे तातडीने सादर करून पुढील कार्यवाहीला गती द्यावी, असे निर्देश मंत्री तटकरे यांनी दिले. समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्यीकरण मरीन थीम लक्षात घेऊन करण्यात यावे, सौरऊर्जेवर आधारित सुविधांचा वापर करावा तसेच वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.


याशिवाय, हरिहरेश्वर येथील प्रदक्षिणा मार्गाच्या कामालाही गती देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!