ठाणे: जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, ठाणे यांच्या मान्यताप्राप्त परिवर्तन महिला संस्था संचालित मुक्ता प्रकल्प मुलींचे बालगृह, टिटवाळा (पूर्व) येथे मागील दोन वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या दोन बहिणींच्या वडिलांचा शोध घेण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने आवाहन केले आहे.
कु. आदिती हरिशंकर यादव (वय 13 वर्षे) आणि कु. आकृती हरिशंकर यादव (वय 12 वर्षे) या दोन्ही बहिणींना काळजी व संरक्षणाची गरज असल्याने 24 एप्रिल 2024 रोजी बालगृहात दाखल करण्यात आले होते.
बालिकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या आईचे निधन झाले असून वडील हरिशंकर यादव हे मद्यपानाच्या व्यसनामुळे मुलींची योग्य काळजी घेऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि संगोपनासाठी त्यांना बालगृहात ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, बालगृहात दाखल झाल्यापासून आजपर्यंत वडील मुलींना भेटण्यासाठी आलेले नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
यामुळे संबंधित पालकांचा शोध घेण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे. “श्री. हरिशंकर यादव, आपण जिथे कुठे असाल, तेथून आपल्या मुली कु. आदिती आणि कु. आकृती यादव यांना भेटण्यासाठी पुढे यावे,” असे आवाहन ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नमिता शिंदे यांनी केले आहे.
या प्रकरणाबाबत माहिती असलेल्या नागरिकांनी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून मदत करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

