ठाणे (जिमाका):- आज जिल्हाधिकारी कार्यालयात सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग ठाणे यांच्यामार्फत जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी करण्याकरीता समिती स्थापन करुन जिल्हाधिकारी मा.डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहामध्ये बैठक संपन्न झाली.
यावेळी सहायक आयुक्त, समाधान इंगळे, महिला व बाल विकास विभाग परिविक्षा अधिकारी सुनंदा मराठे, पोलीस निरिक्षक ठाणे शहर सतीशचंद्र राठोड, विशेष अधिकारी शानिशा स्वप्नाली आहेर, वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक मीरा आगळे, वरिष्ठ लिपिक प्रकाश तायडे आदी उपस्थित होते.
या समितीमध्ये जिल्हाधिकारी, अध्यक्ष, पोलीस अधिक्षक, पोलीस आयुक्त, महसूल विभागाच्या मुख्यालयाबाहेरील महापालिका क्षेत्र, जिल्हा माहिती अधिकारी,शिक्षण अधिकारी,प्राथमिक, शिक्षण अधिकारी माध्यमिक, जिल्हा व्यवसाय व तंत्र शिक्षण अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, प्रकल्प अधिकारी (सबंधित जिल्हयाती सर्व प्रकल्प), अशासकीय 7 सदस्य (त्यात किमान 2 महिला) , जिल्हा समन्वयक, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग हे सदस्य सचिव राहतील अशा प्रकारे रचना करण्यात आली आहे.
यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे शासन निर्णय दि. 20 डिसेंबर 2013 यामध्ये महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्यात बाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम -2013 जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दि. 02 मार्च 2022 च्या शासन निर्णय नुसार सामान्य जनतेच्या मनातील गैरसमजुती दूर करणे, गैरसमजुतीमुळे जातीयता, उच्च नियता,गटपंथमधील परस्पर द्वेष, स्त्री - पुरुष असमानता, दरिद्रय अशा मानवतेसाठी घातक असणाऱ्या गोष्टी विरोधी कायदा जनजागृती प्रचार कार्यक्रम अंमलबजावणी करणे, तसेच दि. 05 एप्रिल 2022 मध्ये पीआयएमसी जिल्हा समिती गठीत करण्यात यावी. व दि. 28 जून 2022 शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी.
अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी समाज कल्याण विभाग कटिबद्ध
जादूटोणा व काळी जादू प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यभर जनजागृती मोहीम तीव्र करणार समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा, अमानुष व अघोरी प्रथांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांची फसवणूक थांबवण्यासाठी 'महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्याचे समूळ उच्चाटन अधिनियम' अंतर्गत समाज कल्याण विभागाच्या वतीने राज्यभर व्यापक जनजागृती व प्रचार-प्रसार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासन पातळीवर विविध स्तरांवर विशेष पावले उचलली जात आहेत.
ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी पथनाट्ये, व्याख्याने, कीर्तने आणि लोककलांच्या माध्यमातून विशेष प्रबोधन मोहिमा राबवल्या जात आहेत. युवा पिढीला या कायद्याची माहिती व्हावी व त्यांच्यात विवेकवादी विचार रुजावेत, यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि अंधश्रद्धा निर्मूलन कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. जादूटोणा आणि काळी जादू विरोधी कायद्याचे स्वरूप, त्यातील कडक शिक्षेच्या तरतुदी आणि तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया याबाबत डिजिटल माध्यमे, भित्तीपत्रके आणि माहितीपुस्तिकांच्या (Booklets) माध्यमातून व्यापक प्रसिद्धी दिली जात आहे.
समाज कल्याण विभागाने ठाणे जिल्हयातील सर्व सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि नागरिकांना या मोहिमेत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आपल्या परिसरात अशा प्रकारच्या अघोरी प्रथा किंवा जादूटोणा चालत असल्याचे आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा समाज कल्याण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

