कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी रेल्वेमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री आणि ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकास देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारच्या अंतिम मान्यतेनंतर आता या स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टॉर्मिनस’ असे होणार आहे.

कोकण रेल्वेच्या उभारणीत ऐतिहासिक योगदान

देशाचे रेल्वेमंत्री आणि केंद्रीय अर्थमंत्री म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावलेले ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांना कोकण रेल्वेचे खरे शिल्पकार मानले जाते. अतिशय खडतर आणि आव्हानात्मक असलेला कोकण रेल्वे प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यात त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. त्यांनी कोकणच्या रेल्वे प्रश्नांवर सातत्यपूर्ण आणि आक्रमकपणे संसदेत पाठपुरावा केला होता.

त्यांच्या याच दूरदृष्टी आणि अथक प्रयत्नांमुळे कोकणात रेल्वे धावू शकली, अशी संपूर्ण कोकणवासीयांची भावना आहे. त्यामुळेच कोकण रेल्वेमार्गावरील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सावंतवाडी रेल्वे स्थानकाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून जनतेकडून केली जात होती.

जनतेच्या मागणीला यश; केंद्र सरकारकडे प्रस्ताव जाणार

कोकणातील जनतेची हीच तीव्र भावना आणि मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारने सावंतवाडी रेल्वे स्थानकास ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे नाव देण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. या नामकरणाबाबतचा अंतिम प्रस्ताव आता केंद्र सरकारच्या गृह आणि रेल्वे मंत्रालयाकडे सादर केला जाईल. राज्य सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे कोकणातील जनतेची अनेक वर्षांची जुनी मागणी अखेर मार्गी लागली आहे.

हा निर्णय म्हणजे कोकण रेल्वेसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या एका महान लोकनेत्याला सरकारने दिलेली खरी आदरांजली मानली जात आहे.