राज्यातील विद्यार्थी, संशोधक आणि वाचनप्रेमींसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीची कामे निर्धारित वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारत बांधकामाची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधांनी सुसज्ज ज्ञानकेंद्र
यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, "या इमारतीचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले असून सध्या फर्निचर, अंतर्गत सजावट आणि इतर पूरक कामे वेगाने सुरू आहेत. या सर्व कामांमध्ये कमालीचा दर्जा राखून ती निर्धारित वेळेतच पूर्ण करावीत."
आधुनिक तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे हे ग्रंथालय राज्यातील विद्यार्थ्यांसाठी, संशोधकांसाठी तसेच वाचन संस्कृती जोपासणाऱ्या सुजाण नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण ज्ञानकेंद्र ठरणार आहे. अभ्यास, संशोधन आणि ज्ञानवृद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व जागतिक दर्जाच्या सुविधा या ग्रंथालयात उपलब्ध करून देण्यात येणार असून, हे ग्रंथालय लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
