वन्यजीव बचाव मोहिमेदरम्यान हस्तक्षेप करणाऱ्यांवर कारवाई करणार

Editorial Team
By -
0

मुंबई, दि. २९ : मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथील शासकीय विश्रामगृह परिसरात जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्याला मारहाण झाल्याच्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे.  भविष्यात वन्यजीव बचाव मोहिमेदरम्यान अनावश्यक हस्तक्षेप करून काठी-लाठी घेऊन सहभागी होणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानपरिषदेत सांगितले.


मुक्ताईनगर (जि.जळगाव) येथील शासकीय विश्रामगृह परिसरात जेरबंद केलेल्या बिबट्याला अमानुष मारहाण केल्याबाबत विधानपरिषद सदस्य एकनाथ खडसे यांनी प्रश्न मांडला. या चर्चेत सदस्य अंबादास दानवे, अभिजीत वंजारी यांनी सहभाग घेतला.

वन मंत्री गणेश नाईक म्हणाले की, १२ एप्रिल २०२६  रोजी मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्या आल्याची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. बिबट्याला सुरक्षितरित्या पकडण्यासाठी भूल देण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, प्राण्याचे वजन व शक्तीचा अंदाज न आल्याने प्रारंभी दिलेल्या भूल औषधाचा अपेक्षित परिणाम झाला नाही. त्यामुळे दुसरा डोस द्यावा लागला आणि बेशुद्ध होण्यास विलंब झाला.

या काळात घटनास्थळी मोठी गर्दी झाल्याने काही नागरिकांनी उत्साहाच्या भरात काठी-लाठीने बिबट्याला अडविण्याचा प्रयत्न केला. वन्यजीव बचावाचे काम केवळ प्रशिक्षित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीच करावे, अशी जनजागृती करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वनमंत्री नाईक म्हणाले की, वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ मधील कलम ११ नुसार स्वतःचे किंवा इतरांचे प्राण वाचविण्यासाठी सद्भावनेतून आवश्यक कृतीस कायदेशीर संरक्षण आहे. मात्र, कोणत्याही प्रकारचा अनावश्यक हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. भविष्यात अशा घटनांमध्ये विनाकारण काठी-लाठी घेऊन हस्तक्षेप करणाऱ्यांवर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल, असे वनमंत्री नाईक यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!