ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षणासाठी आणि प्रस्तावित विकास कामांबाबत चिंता व्यक्त करत ठाण्यात रविवारी पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी भव्य मानवी साखळी आंदोलन केले. सुमारे दीड ते दोन किलोमीटरपर्यंत पसरलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जंगल संवर्धनाची जोरदार मागणी केली.
आंदोलकांनी उद्यान परिसरातील सुमारे 100 एकर जमिनीवरील आरक्षण रद्द करण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला. या परिसरातील जंगल, जैवविविधता आणि नैसर्गिक अधिवास अबाधित राखणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विकासाच्या नावाखाली पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेऊन कोणताही निर्णय घेताना पर्यावरणीय संतुलनाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
आंदोलनादरम्यान काही पर्यावरणप्रेमींनी ऑक्सिजन सिलेंडर हातात घेऊन प्रतीकात्मक आंदोलन केले. वाढते वायू प्रदूषण, कमी होत चाललेली हिरवळ आणि भविष्यातील पर्यावरणीय संकट याकडे शासन व नागरिकांचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. शहरांच्या वाढत्या विस्तारामुळे जंगलांचे संरक्षण ही काळाची गरज बनली असल्याचेही आंदोलकांनी अधोरेखित केले.
पर्यावरण अभ्यासक आणि कार्यकर्त्यांनी जंगलातील नैसर्गिक सलगता खंडित झाल्यास बिबट्यासह इतर वन्यजीवांच्या अधिवासावर परिणाम होऊन मानव-वन्यजीव संघर्ष वाढू शकतो, असा इशारा दिला. तसेच, विकास प्रकल्पांच्या नावाखाली जंगल परिसराचे स्वरूप बदलल्यास त्याचे दीर्घकालीन पर्यावरणीय परिणाम भोगावे लागू शकतात, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
स्थानिक नागरिकांच्या मते, अशा महत्त्वाच्या निर्णयांपूर्वी परिसरातील रहिवासी, पर्यावरण तज्ज्ञ आणि संबंधित घटकांशी व्यापक चर्चा होणे आवश्यक आहे. स्थानिकांच्या भावना, पर्यावरण संवर्धन आणि विकास यामध्ये संतुलन राखूनच पुढील निर्णय घ्यावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
या आंदोलनात विविध पर्यावरण संस्था, स्थानिक रहिवासी, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. घोषणाबाजीद्वारे शासनाने पर्यावरण संरक्षणाबाबत ठोस आणि पारदर्शक भूमिका घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
शांततेत पार पडलेल्या या आंदोलनामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, या संदर्भात प्रशासन पुढे कोणती भूमिका घेणार याकडे पर्यावरणप्रेमींसह सर्वांचे लक्ष लागले आहे.

