मुंबई : राज्यात सर्पदंशामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी जनजागृती, वेळेवर उपचार, अँटी स्नेक व्हेनमची उपलब्धता आणि विविध विभागांमधील समन्वय अधिक प्रभावी करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली.
सदस्य विक्रम पाचपुते यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री आबिटकर बोलत होते. यावेळी सदस्य श्वेता महाले, बाबासाहेब देशमुख, अर्जुन खोतकर आणि जयंत पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.
मंत्री आबिटकर यांनी सांगितले की, इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अँटी स्नेक व्हेनमचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले असून ग्रामपंचायत स्तरापर्यंत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
सर्पदंशानंतर भीतीमुळेही अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर होऊ शकते. त्यामुळे सर्पदंश झाल्यानंतर 'गोल्डन अवर्स'मध्ये रुग्णालयात पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे असून याबाबत राज्यभर व्यापक जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सर्पदंशाचा समावेश अधिसूचित (नोटिफाईड) आजारांच्या यादीत करण्यासाठी विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यात सध्या अँटी स्नेक व्हेनमचा पुरेसा साठा उपलब्ध असून प्रशिक्षणासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. प्रशिक्षण प्रक्रिया पूर्ण झाली असून कुठेही त्रुटी आढळल्यास त्या तातडीने दूर करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
सर्पदंश विषारी आहे की नाही हे अल्पावधीत ओळखण्यासाठी 'अँटी स्नेक व्हेनम किट' प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या किटमुळे उपचाराची दिशा त्वरित निश्चित होऊन रुग्णांना वेळेत योग्य उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
मंत्री आबिटकर यांनी पुढे सांगितले की, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामपंचायतींमध्ये सर्पदंश प्रतिबंध व उपचारासंदर्भातील जनजागृतीची माहिती प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. यामध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.
पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणांना विशेष सतर्कतेच्या सूचना देण्यात येणार आहेत. तसेच आवश्यक ठिकाणी अतिदक्षता उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाशी समन्वय साधण्यात येणार आहे.
राज्यात सर्पदंश प्रतिबंध, उपचार आणि संशोधन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येतील, अशी ग्वाही मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

